मोबाईल टॉवरवरील केबल चोरी करणाऱ्या टोळीचा सुपा पोलिसांनी पर्दाफाश करत चार आरोपींना गजाआड केले आहे. त्यांच्या ताब्यातून तब्बल अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पोलिसांनी दाखविलेली तत्परता व शिताफीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दि. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री रात्रगस्तीदरम्यान पो.हवा. राहुल भाग्यवंत यांना गुप्त बातमी मिळाली की, बारामती तालुक्यातील तरडोली गावात एका पत्र्याच्या शेडमध्ये काही व्यक्ती चोरीच्या मोबाईल टॉवर केबलमधून तांब्याच्या तारा वेगळ्या करत आहेत. ही माहिती सुपा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी स.पो.नि. मनोजकुमार नवसरे यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने पहाटे ३ वाजताच्या सुमारास छापा टाकून चार संशयितांना रंगेहाथ पकडले.
पकडलेले आरोपी असे :
१) ओम राजेंद्र कासवदे (१९),
२) संतोष सतिश गायकवाड (१९),
३) करण भाऊसाहेब आरखडे (१९), तिघेही रा. मोरगाव, ता. बारामती, जि. पुणे,
४) आण्णा आंबादास कोकाटे (२९), रा. कुंभेजा, ता. परांडा, जि. धाराशीव.
त्यांच्याकडून ३ केबल कटर, टॉवर केबल आणि सोललेल्या तांब्याच्या तारा मिळाल्या. पोलिसांनी चौकशीअंती समजले की, या टोळीने ३ ते ६ ऑक्टोबरदरम्यान तरडोली, बाबुर्डी आणि कुतवळवाडी येथील मोबाईल टॉवरमधील केबल चोरी केल्या होत्या. या प्रकरणी मोबाईल टॉवर व्यवस्थापकाच्या फिर्यादीवरून सुपा पोलीस स्टेशनमध्ये तीन स्वतंत्र गुन्हे (क्र. १७८/२०२५, १७९/२०२५, १८०/२०२५) नोंदविण्यात आले आहेत.
आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिली आहे. त्यांच्या कडून सुमारे ₹२.५० लाखांचा मुद्देमाल व दोन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
सदर प्रकरणाचा पुढील तपास सहा. फौजदार वाघोले आणि पो.हवा. गजरे करीत आहेत. पोलिसांना आणखी काही चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता असल्याचे समजते.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. मनोजकुमार नवसरे, पोसई कोळी, मोहरकर, जयंत ताकवणे, सहा. फौजदार वाघोले, पो.हवा. राहुल भाग्यवंत, विशाल गजरे, रुपेश साळुंके, संदिप लोंढे, अनिल दणाने, पो.कॉ. अमोल चिरमे, किसन ताडगे, महादेव साळुंके, निहाल वणवे, सागर वाघमोडे आणि सचिन दरेकर यांच्या पथकाने केली.
सुपा पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरातील मोबाईल टॉवर चोरीच्या घटनांवर आळा बसण्याची शक्यता आहे.
No comments:
Post a Comment