Wednesday, December 24, 2025

*नगरपालिका निवडणूक : पक्ष हरला, व्यक्ती जिंकली?*


 *बारामतीत पवारांच्या सत्तेला पहिली ठेच लागली का?* 

 *प्रतिनिधी-: भीमराव कांबळे* 

बारामती -: लोकजागृती भूमी दि-:२५डिसेंबर २५-: नगरपालिका निवडणूक म्हटली की मतदार पक्षाचं चिन्ह पाहतो, ही जुनी समजूत बारामतीच्या निवडणुकीत मोडीत निघाली आहे का? यावेळी मतदाराने पक्ष नव्हे, तर माणूस पाहून मतदान केल्याचं चित्र समोर आलं आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो.

महाराष्ट्राचंच नव्हे, तर देशाचं राजकारण ज्या बारामतीतून फिरतं, पवारांचं ‘पॉवर हाऊस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरातच सत्ताधारी राजकारणाला पहिल्यांदाच जोरदार धक्का बसला आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

नगरपालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर पवार कुटुंबातील फूट उघडपणे समोर आली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असा थेट सामना होईल, अशी अपेक्षा होती. मात्र शरद पवार गट अपेक्षेप्रमाणे आक्रमक दिसला नाही, असं म्हणावं लागेल का? ठराविक जागांवरच लढत देत त्यांनी सावध रणनीती स्वीकारली आणि उर्वरित मैदान इतर पक्ष व अपक्षांसाठी खुले राहिलं. याचा थेट फायदा व्यक्तीप्रधान राजकारणाला झाला का, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

बारामतीच्या इतिहासात पहिल्यांदाच सहा विरोधक नगरपालिकेत पोहोचले. हे चित्र सत्ताधाऱ्यांसाठी इशाराच मानायचं का?

🔹 प्रभाग ५ : रासपचा धक्का — संघटन अपयश?
प्रभाग क्रमांक ५ मध्ये रासपच्या उमेदवाराचा विजय राष्ट्रवादीसाठी धोक्याचा इशारा आहे का? येथे दिग्गज नावांचा पराभव होणं म्हणजे केवळ स्थानिक नाराजी की संघटनात्मक अपयशाचं प्रतीक, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

🔹 प्रभाग २० : ‘बाहेरचा’ उमेदवार की चुकीचा निर्णय?
प्रभाग २० मध्ये पक्षाने दिलेला “बाहेरचा” उमेदवार स्थानिकांना न रुचल्याने अपक्ष उमेदवाराने राष्ट्रवादीच्या दिग्गजाला छातीठोक पराभूत केलं. हा पराभव चुकीच्या उमेदवार निवडीचा परिणाम होता का?

🔹 प्रभाग १३ : चिन्ह हरलं, व्यक्ती जिंकली?
प्रभाग १३ मध्ये तुतारी चिन्हावरील उमेदवाराचा विजय हा स्पष्ट संदेश देतो का — चिन्ह नव्हे, व्यक्ती महत्त्वाची? हा इशारा पक्षाच्या धोरणकर्त्यांनी गांभीर्याने घ्यायला हवा का?

🔹 प्रभाग १५ : नवख्याने दिग्गजांना धक्का — रणनीती फसली?
संपूर्ण बारामतीत सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेला प्रभाग १५. पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराने पवार समर्थक कुटुंबातील दिग्गज उमेदवारालाच पराभवाची धूळ चारली. हा पराभव व्यक्तीचा होता की पक्षाच्या रणनीतीचा, असा सवाल उपस्थित होतो.

🔹 प्रभाग १४ : संघर्ष संपला की सत्तेला धक्का?
कित्येक वर्षांपासून चालू असलेल्या संघर्षाला प्रभाग १४ मध्ये विरोधकांच्या विजयाने पूर्णविराम मिळाला. हा निकाल राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा मानायची का?

🔹 ‘किंगमेकर’ बॅनर आणि अंतर्गत खेळी?
निवडणुकीनंतर अपक्ष विजेत्यांचे “किंगमेकर” म्हणून बॅनर झळकले. विशेष म्हणजे हे बॅनर लावणारे राष्ट्रवादीचे जुने कार्यकर्ते, माजी पदाधिकारी आणि उपनगराध्यक्षपदापर्यंत पोहोचलेले चेहरे आहेत. मग अपक्षांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठिंबा दिला गेला होता का, असा संशय व्यक्त होतो.

तांदळवाडी प्रभाग क्रमांक १ — जिथे शहराध्यक्ष पद आहे — इथेही उमेदवारांना प्रचंड मेहनतीनंतर निसटता विजय मिळाला. हा निकाल आत्मपरीक्षणाची गरज अधोरेखित करत नाही का?
तसंच प्रभाग क्रमांक ८ मध्ये युवक अध्यक्ष व माजी नगरसेवक एवढी मोठी पदं असूनही नवख्या उमेदवाराला सुमारे ७५४ मतं मिळणं काय संकेत देतं? इथेही पक्षाने आत्मपरीक्षण करायला हवं का?
ही संपूर्ण आकडेवारीच सांगते की काही प्रभागांमध्ये पक्षाची पकड पूर्णपणे सुटली आहे का?

आजही “बारामतीचा विकास म्हणजे अजित पवार आणि अजित पवार म्हणजे विकास” हे समीकरण जनमानसात आहे. मात्र या निवडणुकीत काही ठराविक प्रभागांमध्ये हे समीकरण फेल ठरल्याचं दिसून आलं का?

विशेषतः पाटस रोड परिसर — नेहमी व्यक्तीकडे पाहून मतदान करणारा भाग. इथे संघटन वाढवण्याची सुवर्णसंधी पक्षाने गमावली का?
याचाच कळस म्हणजे प्रभाग क्रमांक १०. हा प्रभाग ‘जॉईंट किलर’ ठरला का? येथे पक्षाच्या महिला शहराध्यक्षांना दारुण पराभव स्वीकारावा लागला. हा पराभव मतांचा होता की संघटनात्मक अपयशाचा आरसा?

खरे प्रश्न आता थेट उभे राहतात —
👉 या प्रभागात सचिन जगदाळे यांना उमेदवारी मिळाली असती, तर निकाल वेगळा लागला असता का?
👉 तिकीट न मिळाल्याने कार्यकर्त्यांनी विरोधात काम केलं की मुद्दाम शांत बसून पक्षाला धडा शिकवला?
👉 की पक्षानेच योग्य माणसाऐवजी चुकीची निवड केली?
असाच प्रकार अनेक प्रभागांमध्ये दिसून आला. कुठे अपक्ष जिंकले, कुठे वेगळ्या चिन्हावर उमेदवार निवडून आले. हे संकेत पक्षाची ताकद असूनही ती योग्य वापरली गेली नाही, असं दर्शवत नाहीत का?
ही निवडणूक बारामतीच्या राजकारणात एक स्पष्ट इशारा देऊन गेली आहे —
फक्त सत्ता, फक्त नाव आणि फक्त पक्ष पुरेसा आहे का, की आता जमिनीवरचा माणूसच निर्णायक ठरणार आहे?
पवारांचं वर्चस्व अजूनही अबाधित आहे, मात्र या निकालाने हेही स्पष्ट केलं आहे की बारामतीत नाराजीचा आवाज आता दबलेला राहिलेला नाही. वेळीच आत्मपरीक्षण झालं नाही, तर ही ठेच भविष्यात मोठ्या हादऱ्याचं रूप घेईल का, हा प्रश्न कायम आहे.

Tuesday, December 23, 2025

नाताळाच्या निमित्ताने गरजू बालकांना ‘सांता’ची भेट;सचिन भाऊ जगदाळे मित्र परिवाराचा माणुसकीचा उपक्रम

बारामती -: नाताळ म्हणजे आनंद, उत्साह आणि सॅन्टा क्लॉजकडून मिळणाऱ्या भेटवस्तूंचा सण. मात्र अनेक गरजू व गोरगरिब मुलांसाठी हा आनंद दूरच राहतो. याच जाणिवेतून नाताळाच्या निमित्ताने सचिन भाऊ जगदाळे मित्र परिवाराच्या वतीने गरजू बालकांसाठी एक अनोखा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमाअंतर्गत आठ नंबर शाळेतील विद्यार्थ्यांना अल्पहाराचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक ‘सप्राईज’ स्वरूपात राबविण्यात आला. सॅन्टा क्लॉजच्या रूपात मिळालेल्या या भेटीमुळे मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहून उपस्थित सर्वांचे मन भरून आले.
गरजू मुलांना मिळालेला हा अल्पहार केवळ अन्नपुरवठा नव्हता, तर त्यांच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण ठरला. मुलांच्या निरागस हास्याने संपूर्ण परिसर आनंदाने भरून गेला. या उपक्रमासाठी सचिन भाऊ जगदाळे मित्र परिवाराने विशेष मेहनत घेतली, तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व सदस्यांनी एकजुटीने काम केले.
यावेळी सचिन भाऊ जगदाळे यांनी आठ नंबर शाळेला भविष्यात लागणारी कोणतीही मदत मित्र परिवाराच्या वतीने करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. सामाजिक बांधिलकी जपत गरजू घटकांपर्यंत आनंद पोहोचविणे हेच खरे सणाचे सार असल्याचे त्यांनी सांगितले.
नाताळाच्या या पवित्र दिवशी गरजू बालकांच्या चेहऱ्यावर हसू फुलविणारा हा उपक्रम उपस्थित नागरिकांकडून कौतुकास पात्र ठरला असून, समाजात माणुसकी जिवंत असल्याचे दर्शन घडवणारा आदर्श कार्यक्रम म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे.

Wednesday, December 10, 2025

सचिन जगदाळे यांच्या ‘शांत राजकारणा’मुळे प्रभाग 8 व 10 मध्ये संभ्रम वाढला; पाटस रोड–प्रगती नगरमध्ये कुजबुज तीव्र

प्रतिनिधी-: भीमराव कांबळे

बारामती — नगरपरिषद निवडणुकीत वातावरण तापले असले तरी प्रभाग 8 आणि 10 मधील आश्चर्यकारक शांतता ही एका नावाभोवती फिरत आहे… सचिन जगदाळे.
लोकप्रियता अफाट, कार्यकर्त्यांमध्ये पकड जबरदस्त… तरीही संपूर्ण बारामतीत एकच प्रश्न —
"जगदाळे कोणाला साथ देणार?"

🔥 प्रबळ दावेदार असूनही प्रचारातून गायब?

08 आणि 10 प्रभागातील दावेदारांमध्ये नाव असलेले जगदाळे अचानक कोणत्याही उमेदवाराच्या प्रचारात सक्रिय दिसले नाहीत. उलट ते केवळ गुजर प्रभाग 15 मध्ये दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु.
मात्र त्यांची खरी ताकद पाटस रोड व प्रगती नगरमध्ये असल्याने तेथे अनुपस्थिती ही कार्यकर्त्यांना चटकन जाणवली.

🧩 ‘जगदाळे शांत तर घडामोडी प्रचंड’ — असा माहोल!

त्यांच्या शांततेमुळे दोन्ही प्रभागात वेगवेगळ्या कथा फिरू लागल्या—

ते अजित पवार गटाशी नाराज आहेत?

पक्षावर मनोमालिनी?

की उमेदवारांवरच नाराजी?

की शेवटच्या क्षणी ‘गुगली’ टाकून बाजू बदलणार?

राजकारणात मौनही कधी कधी संदेश असतो… आणि जगदाळ्यांचे मौन हे नेमके कोणाला घातक ठरणार हे अजून स्पष्ट नाही.

कार्यकर्त्यांत तापलेलं समीकरण

त्यांच्या शांततेमुळे प्रभाग 8 व 10 मध्ये तीन थरांचा संभ्रम—

1. त्यांचे समर्थक एकीकडे थांबलेले — "साहेब काय म्हणतात पाहू…"

2. उमेदवार अस्वस्थ — “शेवटच्या दोन दिवसात निर्णय उलटू शकतो.”

3. विरोधक मात्र आनंदात — “जगदाळे शांत म्हणजे आमचे गणित बदलू शकते.”

🕵️ शेवटच्या क्षणी ‘गुगली’ची शक्यता?

बारामतीचे राजकारण नेहमीच पॅटर्न मोडणारे, आणि जगदाळे हे त्याचे तज्ज्ञ.
म्हणूनच कार्यकर्ते म्हणतात—
"साहेब शांत असतील तेव्हा काहीतरी मोठं शिजत असतं…!"

🎯 कोणाला फायदाआपाय?

जर जगदाळे पक्षाविरोधात गेले तर मोठा स्विंग वोट निर्माण होईल.

जर शेवटच्या दिवशी ते सक्रिय झाले तर निवडणुकीची दिशा उलटू शकते.

आणि जर त्यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला… तर दोन्ही उमेदवारांसाठी संकट.

🧨 अंतिम निष्कर्ष — शांतता की स्फोट?

सध्या बारामतीत एकच चर्चेचा विषय —
"जगदाळे कुणाचा हात धरतील, की कुणाचंच नाही?"
कारण त्यांचं शांत बसणं ही निवडणुकीतली सर्वात मोठी गुगली ठरत आहे…
आणि त्या एका निर्णयावर प्रभाग 8 व 10 चे निकाल उलटू शकतात.

Friday, November 14, 2025

बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीत रंगत; उमेदवारीवर ‘पवार विरुद्ध पवार’ गटातील अनिश्चितता – निष्ठावंत कार्यकर्त्यांचे भविष्य काय?


मुख्य प्रश्न – बारामतीकरांच्या मनातले:

निष्ठावंतांवर अन्याय की नवे नेतृत्व? स्वतःचा विकास की नागरिकांचा? गुन्हेगारी छायेतले चेहरे की स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार?

बारामती -: बारामती नगरपालिकेची निवडणूक दिवसेंदिवस रंगत वाढत चालली आहे. शहरात उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग सुरू झाली असताना, शरद पवार गटाकडून अद्याप अधिकृत उमेदवार जाहीर न झाल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी पायताण उचलत, निष्ठेच्या बॅनरखाली काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना एकच प्रश्न छळतो आहे — “आम्हाला नेमकी संधी केव्हा मिळणार?”

🔹 निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होणार का?

बारामतीत चर्चा अशी आहे की, अनेक वर्षे पक्षाला वाहिलेले निष्ठावंत कार्यकर्ते पुन्हा एकदा केवळ "चादर उचलण्याचे" कामच करणार का? निर्णय प्रक्रियेत त्यांना संधी मिळेल का नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

🔹 स्वत:चा विकास की नागरिकांचा?

बारामतीकरांमध्ये असा प्रश्नही डोके वर काढत आहे की, "नेते स्वतःचा विकास पाहतात की सामान्य नागरिकांचा?"

🔹 अजित पवार गट नवीन चेहऱ्याला संधी देणार का?

दुसरीकडे, अजित पवार गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी नवीन चेहरा दिला जाणार का? की गेल्या काळात वादग्रस्त निर्णय, नागरिकांवरील अन्याय, अतिक्रमण, बँकिंग अनियमितता, हायवा-डंपर प्रकरणांवरील चर्चा, या सर्व छायेत राहिलेले जुने चेहरेच पुढे आणले जाणार — हा मोठा प्रश्न आहे.

🔹 वादग्रस्त आरोपांवर जनतेचे प्रश्न

शहरात जनतेमध्ये खालील प्रश्न मोठ्या प्रमाणावर चर्चिले जात आहेत —

गुन्हेगारी छायेत राहिलेल्या नावांना पुन्हा संधी दिली जाणार का?

नागरिकांना त्रास देणाऱ्या वाहनधारकांना संरक्षण देणाऱ्यांना पुन्हा पद देणार का?

अतिक्रमण करून व्यावसायिक स्थळे उभारणाऱ्यांना नगराध्यक्ष पद मिळणार का?

बँक व्यवहारांमधील घोटाळ्यांवरून चर्चेत आलेल्या काही व्यक्तींना पुन्हा निवडणुकीत पुढे केले जाणार का?

गोरगरीब पतविक्रेत्यांवर कारवाई करून त्यांना उपासमारीला लावणाऱ्यांना पक्ष पुन्हा पाठबळ देणार का?

हे प्रश्न सध्या बारामतीकरांच्या चर्चेचा मुख्य विषय बनले आहेत.

🔹 शेवटचा आणि सर्वात मोठा प्रश्न

“बारामतीला नेमके कसे नेतृत्व हवे आहे — विकासाभिमुख की वादग्रस्त?”

शरद पवार गट निष्ठावंतांना संधी देणार का?

अजित पवार गट नवीन चेहरा आणणार की जुन्यांनाच संधी?

नगरपालिकेला स्वच्छ प्रतिमेचे नेतृत्व हवे की वादग्रस्त अनुभव असलेले?

स्वत:चा विकास करणाऱ्यांवर जनता खुश आहे का?

नागरिकांची सुरक्षा आणि विकास हे खरोखर प्राधान्य आहे का?

हायवा-डंपर प्रकरणातील नावांवर निर्णय प्रक्रिया होणार का?

अतिक्रमण करणाऱ्यांना नगराध्यक्ष पद देणे योग्य का?

बँक घोटाळा चर्चेत असलेल्या व्यक्तींची निवडणूक पात्रता काय?

गरीब पतविक्रेत्यांची समस्या हाताळणारा नेता कोण?

बारामतीला खरे नेतृत्व कोण देणार?


Wednesday, November 12, 2025

जेलमधून सुटताच सांगवीत पुन्हा सक्रिय झाला गांजा विक्रेता — पोलीस पुन्हा कारवाई करतील का?


बारामती तालुक्यातील सांगवी परिसरात पुन्हा एकदा गांजाविक्रीचे सावट निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी गांजा विक्रीप्रकरणी अटक होऊन जेलमध्ये गेलेला आरोपी सुटताच पुन्हा सक्रिय झाल्याची माहिती समोर आली आहे.

यामुळे नागरिकांमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे की —
“गुन्हेगार जेलमधून सुटताच पुन्हा बेकायदेशीर धंद्यात कसा उतरतो?”
“पोलीस यावर नियंत्रण आणणार का?”

स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीने अलीकडच्या काळात गुपचूपपणे गांजा विक्रीचे व्यवहार सुरू केले आहेत. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे व नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या काही महिन्यांपूर्वी याच व्यक्तीविरुद्ध बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन अटक करण्यात आली होती. मात्र, न्यायालयातून सुटल्यानंतर त्याने पुन्हा अवैध धंद्याचा मार्ग पकडल्याचे बोलले जात आहे.

यामुळे गावकऱ्यांकडून प्रश्न उपस्थित केला जातोय की,
“अशा गुन्हेगारांवर देखरेख का ठेवली जात नाही?”
“पोलीस प्रशासन यावेळी ठोस कारवाई करेल का?”

दरम्यान, स्थानिक पोलिसांकडून या प्रकरणी प्राथमिक तपास सुरू असल्याचे समजते. लवकरच पुन्हा कठोर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Saturday, November 8, 2025

काळखैरेवाडी ग्रामपंचायतीचे ४.५ वर्षांचे अभिलेख ‘गायब’! फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी..


बारामती: ता.८–संविधानाच्या ७३व्या घटनादुरुस्तीमुळे ग्रामसभा आणि मासिक सभा या ग्रामविकासाच्या प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाच्या कड्या ठरतात.गावचा विकास आराखडा,सभांचे निर्णय,तसेच आर्थिक हिशेब यांसारखी सर्व संवेदनशील व अधिकृत माहिती ग्रामपंचायतीच्या प्रोसिडिंग नोंदवहीत नोंदली जाते.

मात्र मौजे काळखैरेवाडी (ता. बारामती) येथील ग्रामपंचायत कार्यालयातून १ एप्रिल २०२० ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीतल्या ग्रामसभा व मासिक सभांच्या नोंदवह्या अभिलेखातून पूर्णपणे गायब असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.ही माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते युवराज पोटे यांच्या अर्जावरून उघड झाली.

शासनाच्या परिपत्रकानुसार ग्रामपंचायतीचे दप्तर हस्तांतरण पार न पाडता नवीन ठिकाणी रुजू होणाऱ्या व जिल्हा परिषद सेवेतून सेवानिवृत्त होणाऱ्या ग्रामपंचायत अधिकारी यांच्याविरुद्ध अशा कसुरी बाबत नियुक्ती प्राधिकारी म्हणून प्रादत्त अधिकारात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दक्षतापूर्वक कार्यवाही करणे अपेक्षित आहे.
गटविकास अधिकारी यांनी देखील ग्रामपंचायतचे दप्तर हस्तांतरण कार्यपद्धती अवलंबने क्रमप्राप्त आहे. याकडे विस्तार अधिकारी (पंचायत) व गटविकास अधिकारी पंचायत समिती बारामती यांनी देखील दुर्लक्ष करत कर्तव्यात कसुरी केल्याचा आरोप युवराज पोटे यांनी केला आहे.

राज्य माहिती आयोग देखील अभिलेख गहाळ प्रकरणाकडे गंभीरतेने पाहतो.त्यामुळे अनेक प्रकरणात  जबाबदारी निश्चित करून कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत आदेश देखील देण्यात आलेले आहेत.
काळखैरेवाडीतील ग्रामपंचायतीत अभिलेख गहाळ होण्यामागील गुन्हेगारी हेतू नेमका कोणाचा आणि किती मोठा आहे याची उत्तरे तपासानंतरच मिळणार आहेत. पण गावच्या विकास आराखड्याशी संबंधित महत्त्वाच्या दस्तऐवजांचा असा लुप्त होणे हा गंभीर प्रशासकीय घोटाळा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

"शासकीय लोकसेवकांच्या ताब्यातील अभिलेख गहाळ होणे हा दखलपात्र गुन्हा आहे महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख व्यवस्थापन अधिनियम २००५ नुसार संबंधित आरोपी अधिकाऱ्यावर तातडीने फौजदारी गुन्हा दाखल व्हावा तसेच मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराची ही शक्यता वाटत आहे म्हणून संपूर्ण दप्तराची सखोल चौकशी झाली पाहिजे" युवराज पोटे माहिती अधिकार कार्यकर्ता तथा प्रशिक्षक.

Friday, November 7, 2025

गोसेवेच्या माध्यमातून वाढदिवस साजरा – वाशिम जिल्ह्यात राष्ट्रीय महाकाल सेनेचा आदर्श उपक्रम


वाशिम :राष्ट्रीय महाकाल सेनेच्या वाशिम जिल्ह्याच्या वतीने जिल्हा अध्यक्ष मा. केदार जोशी यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली एक सामाजिक व धार्मिक उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय महाकाल सेनेचे संस्थापक परम पूज्य श्री श्री 1008 दिगंबर कुशाल भारती जी बापू तसेच राष्ट्रीय महाकाल सेनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष गुरुवर्य प्रकाश भाऊ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने वाशिम येथील गोशाळेमध्ये जाऊन गोमातेला चारा वाटप कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने पार पडला.

या पवित्र प्रसंगी गोलू भोंडणे, अभी अवचार, तन्मय मते, काना खत्री, प्रथमेश भगत, ऋतुराज खडसे यांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व श्रद्धावान उपस्थित होते.

गोसेवा हा भारतीय संस्कृतीचा आत्मा असल्याचे प्रतिपादन करत उपस्थित मान्यवरांनी बापूंच्या व शिंदे गुरुवर्यांच्या वाढदिवसानिमित्त अशा सामाजिक उपक्रमांद्वारे समाजसेवेचा संदेश देण्याचे आवाहन केले.

या उपक्रमाचे आयोजन व यशस्वी नियोजन राष्ट्रीय महाकाल सेना वाशिम जिल्हा टीमने केले.

*नगरपालिका निवडणूक : पक्ष हरला, व्यक्ती जिंकली?*

 * बारामतीत पवारांच्या सत्तेला पहिली ठेच लागली का?*   * प्रतिनिधी-: भीमराव कांबळे*  बारामती -: लोकजागृती भूमी दि-:२५डिसेंबर २५-:...