मुख्यसंपादक -: अमित बगाडे
गणेशनगर रखडलेल्या गटर कामाची निविदा ओपन-काम कधी होणार स्थानिक नागरिकांचा सवाल?
बारामती (प्रतिनिधी) - "गाव तसं चांगलं, पण राजकीय भानगडींमुळे वेशीला टांगलं" अशी अवस्था बारामती तालुक्यातील झारगडवाडी या गावची झाली आहे. मागील तीन वर्षांपूर्वी गावातील गणेशनगर परिसरातील नागरी लोकवस्ती शेजारी अवैध उत्खनन झाले आहे. पंचायत समितीच्या अखत्यारीत येत असलेल्या या गायरान गटाचे भोगवटादार स्वतः गटविकास अधिकारी असूनही गौण खनिज चोरीसारख्या घटनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
स्थानिक रहिवासी नागरिकांनी वारंवार विरोध करूनही ग्रामपंचायत प्रशासनाने याच उत्खननामध्ये मैला मिश्रित सांडपाणी सोडले आहे. आज अखेरीस या अवैध उत्खननामध्ये पडून दोन नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मागील वर्षी १५ ऑगस्ट रोजी संपूर्ण देश स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश नाळे आणि स्थानिक नागरिकांनी पंचायत समिती बारामती येथे आमरण उपोषण केले होते. त्यावेळी सखोल चौकशी अंति संबंधित दोषी इसमांवर योग्य कार्यवाही करण्याच्या आश्वासनावर उपोषण सोडण्यात आले होते.
सदर अवैध उत्खनन मध्ये सोडलेल्या मैला मिश्रित सांडपाण्यामुळे आसपासच्या परिसरात मागील तीन वर्षांपासून साथीच्या रोगराईने तांडव तर घातलेच आहे. त्यासोबत आसपासच्या पिण्याच्या पाण्याचे जल्लस्त्रोतही खराब झाले आहेत. शेतमजुरी करून जगणाऱ्या स्थानिक नागरिकांचे अशा अनपेक्षित आजारांनी अक्षरशः संसार उध्वस्त होण्याची वेळ आली आहे. या परिस्थितीमधून मार्ग काढण्यासाठी गाव पुढाऱ्यांची मनीषा नसतानाही केवळ सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यावर या सांडपाणी व्यवस्थापनासाठी आज अखेरीस ५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
त्यापैकी २० लक्ष रुपयांचे काम करण्यात आले असून उर्वरित ३० लक्ष रुपयांचे कामास जानेवारी महिन्यात प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती परंतु प्रशासनातील बदलामुळे रखडलेले होते. अनेक अडचणींचा सामना करत तब्बल ६ महिन्याच्या कालावधीनंतर कामाची निविधा खुली केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सद्यस्थितीला "काम मंजूर झाल्यानंतर राजकीय लोक स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कामास अडचणी आणून विलंब लावत होते. आता निविधा खुली झाल्याने काम गुणवत्तापूर्वक, पारदर्शक कामे करून गावाचा विकास करावा आणि तडजोडीच्या राजकारणातून आम्हावर लाजलेल्या मैला मिश्रित सांडपाण्याच्या भस्मासुरापासून आम्हाला त्रासमुक्त करावं. अशी भावना नागरिकानी व्यक्त केली आहे.
No comments:
Post a Comment