मुख्य संपादक - अमित बगाडे
भारतातील 100 युनिकॉर्नचे एकूण मूल्य 332.7 अब्ज अमेरिकी डॉलर्स
वर्ष 2022 च्या पहिल्या चार महिन्यांत भारतात 14 युनिकॉर्न उद्योगांचा उदय झाला
भारतातील युनिकॉर्न उद्योगांची लाट नव्या उंचीवर पोहोचली असून, 2 मे 2022 रोजी देशात 100 व्या युनिकॉर्नने जन्म घेतला आहे. आज जागतिक पातळीवरील दर 10 युनिकॉर्न उद्योगांपैकी 1 उद्योग भारतात जन्मलेला आहे.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी भारताची ही कामगिरी त्यांच्या ट्विटमधून ठळकपणे सर्वांसमोर ठेवली आहे.
भारतातील स्टार्ट अप परिसंस्था म्हणजे युनिकॉर्नच्या संख्येच्या बाबतीत जगात तिसऱ्या क्रमांकावर असणारी परिसंस्था ही 5 मे 2022 रोजी प्राप्त माहितीनुसार एकूण 332.7 अब्ज अमेरिकी डॉलर्स मूल्याच्या 100 युनिकॉर्न उद्योगांची जननी आहे अशी माहिती त्यांनी दिली.
केंद्रीय मंत्री गोयल म्हणाले की, वर्ष 2021 मध्ये भारतातील युनिकॉर्न उद्योगांच्या संख्येत मोठी उसळी दिसून आली. या वर्षभरात एकंदर 93 अब्ज अमेरिकी डॉलर्स मूल्याच्या एकूण 44 स्टार्ट अप उद्योगांनी युनिकॉर्न प्रकारात स्थान मिळविले.
वर्ष 2022 च्या पहिल्या चार महिन्यांत भारतात 18.9 अब्ज मूल्य असलेल्या 14 युनिकॉर्न उद्योगांचा उदय झाला आहे.
भारतातील युनिकॉर्न उद्योगांच्या संख्येने शतकाचा मोठा पल्ला ओलांडलेला असतानाच, देशांतर्गत स्टार्ट अप परिसंस्थेने स्वावलंबन आणि स्वत्व टिकविण्याच्या दिशेने प्रगती करण्याची मोहीम पूर्वीप्रमाणेच पुढे सुरु ठेवली आहे. आत्मनिर्भर भारताची संकल्पना स्टार्ट अप परिसंस्थेमध्ये खोलवर रुजली असून येत्या काळात ती आपली वाटचाल अशीच पुढे सुरु ठेवेल असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment